विश्व………..

काहीच अर्थ नाही ह्या शब्दांना, पण खूप जवळचे नाते आहे ह्या शब्दांशी. वय वर्ष १ ते ५ मधील हा खेळ. खेळताना शब्दांची लय पकडली जाते. बडबड गीत कसे असते ना, अगदी तसेच असते. खेळायला मात्र आजी लागते. आज्जीच बोट हळुवार पणे नातवंडाच्या बोटांच्या उंचवट्यावरुन फिरते. जसे बोट फिरते तशी बाळाची नजर आणि मान पण फिरते. हीच असते घरी असलेली पारंपारिक फिजिओथेरपी जी नातवंडांच्या बोटांना आणि डोळ्यांना प्रमाणित व्यायाम घडवून आणते.

अटक मटक चवळी कशी असते चटक!!!!, हा ही खेळ पारंपारिक आहे . सुट्टी लागली आहेच. आपल्या परिसराच्या लहान बाळांचा एखादी आजी असा संस्कार वर्ग घेत असेल. छंद वर्ग म्हणजे सुट्टीचे केलेले शिस्तबद्ध आयोजन असते. कोणी कोणाशी खेळायचे हे त्या वर्गाच्या मावशी सांगतात. मस्त मोकळीक मिळतेच असे नाही. धकाधकीच्या जीवनात, गजबजलेल्या परिसरात मैदाने तर फारच कमी आहेत. इमारतींमध्ये शेजारचे कोणी माहित नसते तर मूल खेळायला पाठवायचे कुठे?? असेच छंद वर्ग ही काळाची गरज आहे. नियम तर हवेच पण तिथे खरोखरी मुलांना काही शिकवले जाते का?? अशी ही काही उत्तम शिबिरे असतात जिथे मूल अत्यंत मोकळ्या वातावरणात रोज काहीना काहीतरी खेळते, नवीन ज्ञान आत्मसात करते, त्याच्यातील कलागुणांची जोपासना होते. संस्कार घडवले जातील. असे मुलांना मिळाले तर मुलंच दर वर्षी सुट्टीची मनापासून वाट पाहतील. आई वडिलांना मुलांची सुट्टी म्हणजे फार अडचणीची ठरते.

दोघे ही नोकरी करत असले तर कुठेतरी दिवसभर मूल पाठवावे लागते.  मग अशा वेळी ते सांभाळले जाते ही बाजू गृहीत असते. शाळांमधून पण अशा छंद वर्गांची गरज पूर्ण केली जाते. आपलं मूल कुठल्या बाबतीत उत्सुक आहे हे मुलांशी बोलून पालकांनी जाणून घेतले पाहिजे म्हणजे छंद वर्गांचा काळ संपल्यावर ती रुची वाढण्यासाठी अधिक मार्गदर्शन देता येईल. बैठे खेळ हे सुद्धा जराश्या मोठ्या मुलांमध्ये आवडीने खेळले जातात. आधुनिक तंत्रद्यान शिकवणारे पण वर्ग आहेत. मुलांमध्ये उर्जा खूप असते तिला योग्य ते वळण लावले गेले पाहिजे. धुसपूस करणारी मुले, उपद्व्याप करणारी मुले कि कुठेतरी अस्वस्थ असतात. मानिसक अशांतता हे कारण प्रामुख्याने असते. छोटेसे समुपदेशन अशा वेळी योग्य ठरते. पालकांशी बोलून समस्येचे निराकारण केले जाऊ शकते. मुलांची उर्जा ही पालकांना सुट्टीत डोईजड जाते. मग घराच्या जवळ जो छंद वर्ग आहे तो निवडला जातो. बंदिस्त अशा एका खोलीत दाटीवाटीने मूल बसवली जातात.

असे वर्ग घेणारे प्रशिक्षित असतातच असे नाही. सुट्टीचा एक घरगुती उद्योग म्हणून पण असतात. पालकांनी नेहमी जाणीवपूर्वक चौकशी करून असे छंद वर्ग निवडले पाहिजेत. असेच जर विचार न करता मुलांना पाठवत राहिले तर मूल सुट्टीलाही कंटाळेल. जे त्याच्या बौद्धिक, शारीरक आणि मानसिक वाढीला  अडथळा ठरेल. सुट्टी करता दर वेळी लांबच, खूप पैसे खर्च करूनच गेले पाहिजे असे ही नाही. आपल्या घर जवळच्या एखाद्या डोंगरावर, किल्ल्यावर, बागेत कुठेही जाता येते. मुलांना आई वडील बरोबर असणे हे खूप आवडते. वय वर्ष पाच ते आठ मध्ये अग्निशामक, पोलीस, पोस्ट ऑफिस, एखादा उद्योग व्यवसाय पाहायला जाण्यास त्यांना आवडते. मुलांची सुट्टी म्हणजे पालकांनी त्यांच्या सुट्टीचे नियोजन  करावयास हवेच. काही दिवस घरी तर काही वेळ बाहेर असे कागदावर मांडून ठेवावे. वय वर्ष आठ नंतर इलेक्ट्रिकल चा बेसिक कोर्स, थोडीशी सुतार कामाची माहिती, प्लंबिंग म्हणजे काय हे सर्व काही मित्र मैत्रिणींचा गट तयार करून ह्या कामातील आपल्या घरी नेहमी बोलावणाऱ्या व्यक्तीला बोलावून आपल्या उपस्थितीत मार्गदर्शन मिळवून द्यावे.

घरातील काही जवाबदारी सोपवावी. प्रत्येक सुट्टीकरता काहीतरी वेगळे असावे. पारंपारिक खेळाबरोबर आधुनिक जीवन शैलीत उपयोगी पडणारे खेळांची पण माहिती असावी. खेळ आणि सुट्टी यांचे नाते जपले तर पाहिजेच. सुट्ट्या कधीच सुरु झाल्यात, कंटाळवाण्या वाटण्याच्या आत सुट्टीचे नियोजन करुया आणि मुलांबरोबर ताजेतवाने होऊया…