अमेरिकेतील लग्न; पडघम भुलेश्वरला

pailteer
esakal.

माळशिरसच्या रमेश व मनीषा या "माळशिरसकर' दांपत्याला आपल्या कॅनेडियन सुनेला असंच गावकऱ्यांसमोर नेणे बरोबर वाटेना. त्यासाठी त्यांनी सर्वांना निमंत्रण पत्रिका देऊन माळशिरसकरांचे श्रद्धास्थान असलेल्या भुलेश्वर देवस्थानच्या ठिकाणी सर्वांना आमंत्रित केले. त्यांच्या आमंत्रणास सर्व संबंधितांनी मान दिला आणि भुलेश्वर देवस्थानी रंगला एक अनोखा सोहळा.
माळशिरस (ता. पुरंदर) या गावाशी गेल्या तीस वर्षांचा ऋणानुबंध असलेल्या डॉ. रमेश अवस्थी व मनीषा गुप्ते यांनी आज एक अनोख्या कार्यक्रमाने अधोरेखित केला. तीस वर्षांपूर्वी फाउंडेशन फॉर रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ या संस्थेच्या वतीने आरोग्य शिक्षणाचा प्रकल्प घेऊन हे दांपत्य आपल्या लहानग्या प्रतीक व प्रियाला घेऊन मुंबईहून माळशिरसला आले. हा प्रकल्प पाच वर्षांचा होता. माळशिरसशी जोडली गेलेली नाळ तोडणे असह्य वाटू लागल्याने हा उपक्रम पूर्ण होण्याआधीच त्यांनी येथे "महिला उत्कर्ष मंडळ (मासूम)' या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. त्यामुळे पुढे या दोघांचा गावाशी संपर्क कायम राहिला. त्यांची मुले उच्च शिक्षण घेऊन परदेशात कार्यरत असली तरी त्याच्या लेखी माळशिरस हेच आपले गाव कायम राहिले.
संयुक्त राष्ट्र संघाच्या उपक्रमात अमेरिकेत कार्यरत असलेल्या प्रतीकने नुकतेच मास्टर कार्ड फाउंडेशनमध्ये कार्यरत असलेल्या कॅनडाच्या जेन बॉल्डविन हिच्याशी अमेरिकेत नोंदणी पद्धतीने विवाह केला. विवाहानंतर प्रतीक आपली पत्नी व ऍश्‍ली गुड, इलाई अँगन, विक्‍टोरीया मोरब्लेकनी या मित्रांसह भारतात आला. प्रतीकला आपल्या पत्नी व मित्रांना "आपले' गाव दाखवायचे होते.
येथील तरुणांनी स्वहस्ते बनवलेले सुग्रास जेवण, मासूमच्या कार्यकर्त्यांनी हौसेने आणलेला गावातीलच बॅंड, आलेल्या निमंत्रिकांकडून "किती मोठा झालास प्रतीक'च्या शुभेच्छा, रमेश, मनीषा या वरबाप, वरमाईच्या तब्बेतीची आस्थेने होणारी विचारपूस, येणाऱ्या काकू, दादा, मावशी यांची आपुलकीने गळाभेट घेणारी प्रिया आणि हे सर्व मोठ्या कौतुकाने पाहणारी कॅनेडियन सूनबाई, तिच्या पाठराखणी ऍश्‍ली, विक्‍टोरीया आणि मुऱ्हाळी इलाई अँगेन. हा साराच सोहळा निखळ कौतुकाचा आणि सोज्वळ प्रेमाचा होता.
हे सारे परदेशी पाहुणे या सर्व स्थानिकांशी एकरूप झालेले पाहून कॅनडाशी जणू आपलीच सोयरीक झाली अशी उपस्थितांची भावना होती. या आनंद सोहळ्याने आपलेपणाचा खरा कळस गाठला तो उपस्थितांसमवेत नवदांपत्याने आणि या परदेशी पाहुण्यांनी गावातील बॅंडच्या तालावर ठेका धरला तेव्हा. अमेरिकेतील न्यू जर्सी येथे "मानवी' या संस्थेच्या माध्यमातून तेथील भारतीय उपखंडातील महिलांच्या समस्येवर काम करत असलेल्या प्रियाने तिच्या बाल मैत्रिणींबरोबर खेळलेल्या फुगडीतील आपलेपणा पाहून मन भरून आले.
अमेरिकेत झालेल्या या लग्नाचे पडघम भुलेश्वरी वाजले. ते केवळ वाजत नव्हते तर ज्ञान आणि धनाच्या जलव्यापेक्षा प्रेम आणि आपुलकीचा ओलावा कितीतरी सुखद आणि सुंदर असतो याची प्रचितीही देत होते.